Friday, December 04, 2009
गूगलचे लिप्यंतर (Google Transliteration)
माझा एक फ्रेंच मित्र आहे - जिरोम म्हणून. त्याच्या कॉम्प्युटरला मी शक्यतो हात लावत नाही. कारण त्याच्या laptop मध्ये अथपासून इतिपर्यंत सर्वकाही फ्रेंच भाषेत आहे; आणि अस्मादिकांना फ्रेंच मधल्या bonjour व merci च्या पलीकडे ओ कि ठो कळत नाही. जिरोमची हि तऱ्हा; तर चिनी मित्राच्या कॉम्प्युटरकडे बघायला सुद्धा नको. फ्रेंच भाषा कळली नाही तरी निदान लिपी इंग्रजीसारखी आहे. चिनी भाषेची अगम्य गिचमिड पाहून आपण निरक्षर असल्याचा भास मला होतो. तरीही हे दोन्ही मित्र आप-आपल्या भाषेतले keyboard (टंक-लेखणी) वापरून त्यांच्या मित्रांना emails लिहितात, online निरोप पाठवतात.
मी मात्र माझा इंग्रजी keyboard घेऊन हळूहळू मराठी खरडत बसतो. मराठी लिहिण्यासाठी अगदी सुरुवातीला 'शिवाजी', 'संभाजी' पासून ते 'नूतन', 'सुषा'पर्यंतचे fonts वापरून पाहिले. नंतर 'श्री' लिपी लिहून बघितली. काही मराठी वेबसाईटसमुळे हे अजून सोपे झाले ('मिसळपाव', 'उपक्रम' या तर लाडक्या साईट्स). अर्थात महाजालावर न जाता कॉम्प्युटर मधली संचालन-प्रणाली (operating system) वापरून मराठी लिहिता येते. Mircosoft आणि Linux मध्ये भारतीय भाषा वापरण्याची सोय आहे, पण Apple Macintosh (Mac OS X) मधली 'देवनागरी लिपी' मला खूप आवडते. हि बऱ्याचशा applications मध्ये लिहिता येते. पण या सर्व पद्धतींमध्ये मराठी लिहिताना बरीच धोबीपछाड करावी लागते. कधी-कधी एखादा मोठा शब्द लिहिताना, जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखी केविलवाणी अवस्था होते.
या सगळ्यांवर जर कुणी कडी केली असेल तर ती गूगल लिप्यंतरने (Google Transliteration). 'लिप्यंतर' हा शब्द ऐकून कदाचित ट्यूब पेटली नसेल, पण वरती सांगितलेल्या काही लिप्या हे तंत्र वापरतात. काही मराठी वेबसाईटसमध्ये लेख लिहिण्यासाठी हीच पद्धत वापरतात. अगदी सध्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून लिहिलेला शब्द मराठी लिपीत दिसतो. गूगलने हि संकल्पना अगदी सहजपणे पण कल्पकतेने वापरली आहे. यामध्ये मुख्यतः भारतीय भाषा (मराठी, हिंदी, कन्नड, बंगाली, तमिळ वगैरे) तसेच अरबी, पर्शियन, नेपाली अशा भाषांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे तुम्ही जीमेल (Gmail/Google Mail) मधून लिप्यंतर वापरू शकता. यासाठी email लिहिताना डाव्या कोपऱ्यात 'अ' मधील 'मराठी' पर्याय निवडा. आता तुम्ही कोणताही शब्द लिहून SPACE दाबल्यावर तो शब्द मराठी लिपीत दिसेल. अधिक माहितीसाठी जीमेल-लिप्यंतर पहा.
विशेष म्हणजे तुम्हाला मराठी लिहिताना फारसा विचार करावा लागणार नाही. उदा. 'संकल्पना' हा शब्द लिहिताना पुढीलपैकी कोणतेही पर्याय वापरू शकता: sankalpana, sanklpana, sanklpna, snklpna. बहुतेक सर्व शब्दांचे लिप्यंतर बरोबर होते. पण जर तुम्हाला दुसरा शब्द अपेक्षित असेल तर इतर पर्यायी शब्दांची यादी बघता येते. उदा. तुम्ही 'vidyut' लिहिल्यावर जर त्या शब्दावर टिचकी मारली तर पर्यायी शब्द निवडता येतात - विद्युत, विदयुत, विद्यूत. इतके करूनही जर तुम्हाला एखादे अक्षर मिळत नसेल तर तुम्ही 'Ω' या चिन्हावर जाऊन विशिष्ठ अक्षर लिहू शकता. मराठी लिहिताना मध्येच तुम्हाला इंग्रजी शब्द लिहायची सुरसुरी आली तर तो शब्द लिहून झाल्यावर SPACE दाबण्याऐवजी SHIFT+SPACE दाबू शकता.
ओर्कुट वर पण तुम्ही लिप्यंतर वापरू शकता (बरेच जण आधीपासून वापरत असतील म्हणा). पहा ओर्कुट-लिप्यंतर. गूगलने याबाबतीत अजून एक पाउल पुढे टाकले आहे. ते म्हणजे bookmarklet वापरून तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर मराठी लिहू शकता. याची सविस्तर माहिती इथे दिली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर महाजालावरील यच्चयावत संकेतस्थळांवर मराठी लिहिता येते. मग आता कशाची वाट न बघता कोणत्याही साईटवर बिनधास्त मराठी लिहा.
अर्थातच भाषांतर आणि लिप्यंतर मध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. पण गूगलने भाषांतराचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. लिप्यंतर वापरताना तुम्ही एखाद्या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर बघू शकता. त्यासाठी शब्दकोशाची (Dictionary) सोय आहे. सध्यातरी हा शब्दकोश आणि भाषांतर थोड्या शब्दांपुरते मर्यादित आहेत. पण काही काळानंतर नक्कीच त्यांची व्यापकता वाढेल. अजून एक गम्मत. गूगल भाषांतर (Google Translate) या संकेत-स्थळावरून एका भाषेतील लेख (documents) दुसऱ्या भाषेत आपोआप अनुवादित होतात. एवढेच नव्हे तर अख्खीच्या अख्खी वेबसाईट दुसऱ्या भाषेत पाहता येते. सध्या जरी यामध्ये मराठीचा समावेश नसला तरी हिंदीमध्ये भाषांतर करता येते. मराठी आणि हिंदी मधील बरेच शब्द सारखे असल्याने मी 'इंग्रजी-ते-हिंदी' भाषांतर खूप वेळा वापरतो.
गूगलचे महाजालावरील वाढते वर्चस्व (गूगल-वाचनालय, टीका ) जरी चिंताजनक असले तरी त्यांचे एकापेक्षा एक कल्पक उपक्रम आणि सकारात्मक दृष्टीकोन (Dont be evil हे ब्रीदवाक्य) बघून, गूगल हे एक 'अभिनव संकल्पनांचे माहेरघर' आहे असेच वाटते. संगणकावर आणि महाजालावर मराठीचा (आणि भारतीय भाषांचा) वापर हा इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, चिनी, जपानी भाषांच्या इतका सार्वत्रिक नसला म्हणून काय झाले... गूगलसारख्या कंपनीने भारतीय भाषांच्या लिप्या सहजपणे उपलब्ध करून दिल्या 'हेही नसे थोडके!'
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
email chi kaame kartana english chi ewadhi saway zaliy na ki tu je mhantos te karta yeil ase kadhi lakshatch aale nahi. thank you very much for this information.
Post a Comment